मंगळवार, २५ जून, २०१३

बागलाणचे शिलेदार:- साल्हेर,सालोटा,मुल्हेर,मोरागड,हरगड,मांगी तुंगी

बागलाणचे शिलेदार 
ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. नाशिक मधला ऐतिहासिक बागलाण प्रदेश,पाठीवर १५ किलो वजन घेऊन जवळ जवळ ३८ तासांची चढाई,४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, सूर्यास्ताला पश्चिमेकडे आलेली केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य,  गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर चंद्राचे प्रतिबिंब आणी उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले, डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा,  उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत  येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा. स्वप्नवत अश्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो.
ओह, ह्या सुखाची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगर रांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच... साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड,हरगड,मांगी तुंगी, तांबोळया, न्हावी रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्स ची इथे पार चैन असते. एकापेक्षा एक अवघड आणि सरस असे किल्ले चढताना दमछाक तर होतेच पण त्यांचा इतिहास ऐकल्यावर मन वेडे होऊन जाते. 

साल्हेर-सालोटा :
आमच्या स्वप्नातीत ट्रेकची सुरवात झाली ती साल्हेर सालोटा ट्रेक ने. एका शनिवारी पूर्ण दिवस प्रवास करून (पुणे- सटाणा- वाघाम्बे) साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाशी पोहोचलो. साल्हेर हा  महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची ५१४१ फूट ( १५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून ४९८६ फूट आहे.
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
वाघाम्बे गावातून जाणारा रस्ता हा थोडा अवघड असला तरी कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या वाटेने गेल्यास सालोटा किल्ला पण करता येतो.
 उजवीकडे साल्हेर आणि डावीकडे सालोटा 
सर्व वाट रुळलेल्या असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता कमी आहे. तरीही सामान जास्त असेल तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना सामान घेऊन न जाता साल्हेर सालोटा मधल्या खिंडीमध्ये ठेवून जायचे असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो.

सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदून केलेल्या वाटा जास्त उंचीचा असल्याने सुमारे एक तासात आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा पूर्वी साठवण करण्यासाठी उपयोग होत असावा. या किल्ल्यावर पाणी नाही. येथून साल्हेर किल्ल्याचे पिर्यामिड सारखे रूप डोळ्यात भरते. 


साल्हेर हा किल्ला कळसूबाई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून त्यास अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक  पार्श्वभूमी आहे. सालोटा उतरून खिंडीत आल्यावर, येथून आपण चार ते पाच तासात साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी जाऊ शकतो. साल्हेर वर जाण्याच्या मार्गात अनेक गुहा आणि पाण्याची टाकी दिसतात. किल्ल्यावर दोन गुहा असून राहण्यासाठी योग्य आहेत. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी असून गुहेच्या समोरच गंगासागर तलाव आहे. या तलावात कायम पाणी असते. ते पिण्यायोग्य नसले तरी उकळून पिणे चांगले.
या किल्ल्यावरचे सर्वात बघण्यासारखे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच असे परशुराम मंदिर. गुहेपासून ४५ मिनिटे चालून गेल्यावर सर्वात उंच अश्या ह्या किल्ल्यावर छोटी टेकडी दिसते. त्यावर हे मंदिर बांधलेले असून तेथून आजूबाजूच्या परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य आपले डोळे दिपवून टाकते. थंड गार वारा, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, तेथून दिसणारा सालोटा, सूर्यास्ताला पश्चिमेकडे येणारी केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य. केवळ अप्रतिम असे अनुभव.
या किल्ल्याच्या दोन्ही वाटांनी जाताना प्रत्येकी ६ दरवाजे लागतात. वाटेत प्रवेशद्वाराजवळ कोरलेले शिलालेख, दगडात कोरलेले गणपती, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बुलंदी असे बुरूज अन तटबंदी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात.
वाघाम्बे गावातून चढाई करून दुसऱ्या दिवशी साल्हेर वाडी गावातून उतरावे. वाघाम्बे गावातून पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. येथे पाहण्यासारखी अनेक स्पॉट असल्याने येथे जास्त वेळ हाताशी ठेवावा.

मुल्हेर आणि मोरागड
येथूनच पुढे मुल्हेर गावी जाऊन पुढच्या दिवशी मुल्हेर आणी मोरागड दोन्ही करता येतात.मुल्हेर गावातील शाळा, देवालय आणि उद्धव महाराज समाधी पाहण्यासारखी आहे.

मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये असून किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९०  फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. 
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५  किमी अंतर आहे. 
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी सधन आहेत.
 मुल्हेर किल्ल्याला लागूनच हरगड असून दोन दिवसात हे तिन्ही किल्ले करणे शक्य आहे.

मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घरापासून सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.  पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेले आहेत. ते पाहून वाट बरोबर असल्याची खात्री होते.
तेथून थोडे पुढे गेल्यास गणेश मंदिर आणि सोमेश्वर मंदिर लागते.गणेश मंदिरासमोर असलेल्या तलावात पडलेले मंदिराचे प्रतिबिंब पाहून डोळे सुखावून जातात. चौदाशे साली किल्ल्यामध्ये गाव वसलेले होते, त्याच्या खुणाही येथे सापडतात.
 सोमेश्वर मंदिर:
'सोमेश्वर मंदिर' हे १४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो. गाभारा पाताळात असून तेथे जाण्यासाठी भुयारी पायऱ्या आहेत. मंदिरात असलेले पुरुषभर उंचीचा नंदी आणि दगडात कोरलेले कासव आपले लक्ष वेधून घेते.
येथून  गडावर जाण्यास सुमारे तीन तास लागतात. येथून अनेक 'गुरांच्या वाटा' फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. वाटेत मोती टाके असून त्याच्या उजवीकडून रस्ता वर जातो. वाटेत अजून एक कातळात कोरलेला मारुती दिसतो.
किल्ल्याला अतिशय भक्कम अशी सात प्रवेशद्वारे असून एका-आड  एक अशी त्यांची रचना आहे. वाटेत दोन  गुहा असून किल्ल्यावर पोहोचल्यावर नऊ पाण्याची टाकी आहेत. मुल्हेर वरून मोरगडा वर जाताना वाटेत राजवाड्याचे भग्न अवशेष आणि भडंगनाथाचे मंदिर लागते.
किल्ल्यावरून विस्तीर्ण अशी पर्वतरांग दृष्टीस पडते. दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नाहीत.
मुल्हेरवरून मोरा कडे जाणाऱ्या प्रवेशद्वारात दरड कोसळली असल्याने जायचा मार्ग छोटा बनला आहे.  मुल्हेर आणि मोरागडाच्या खिंडीत अभेद्य अशी तटबंदी असून तेथून  दगडात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला मोरागडावर घेऊन जातात.

मोरागडाचा हा पहिला व अभेद्य दरवाजा आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो.
पुढे मोरागडावर काही विशेष पाहण्यासारखे नाही. येथून मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, ताम्बोळ्या असे अनेक दुर्गांचे दर्शन होते.

मांगी-तुंगी :
मांगी-तुंगी हे जुळे किल्ले ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हे किल्ले  गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान ही आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याचे जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. येथून पुढे गुजरात राज्य चालू होते

हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्टच्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे.
मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.
मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? )  
मांगी गडावरून तुंगी शिखराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते.

दोन्ही गडांवर असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यातला काही कोटिग करून जपलेल्या आहेत. 
येथून आजूबाजूच्या परिसराचे सुरेख दर्शन होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या ठाकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे असे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत. 
येथून उतरून तुंगी शिखरावर जाता येते. जवळपास तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून आपण येथे पोहोचतो.
पायथ्याशी प्रसादाची आणि पाण्याची सोय असून मंदिरात ट्रस्ट तर्फे जेवणाचीही सोय होते. 

हे सहाही किल्ले व्यवस्थित प्लानिग केले तर चार दिवसात होऊ शकतात. सटाण्यापासून पुणे- मुंबई ला जाणाऱ्या अनेक गाड्या मिळू शकतात. या पूर्ण ट्रेक ला तिकीट भाडे धरूनही रु. १५०० पेक्षा जास्त खर्च येत नाही. 
निसर्गाचे खरे रौद्र रूप अनुभवायचे असेल तर हा खरेच तुफान ट्रेक होऊ शकतो. महाराष्ट्रात असे काही अविस्मरणीय गडकिल्ले आहेत, याबाबत आपण खरेच सुदैवी आहोत. 
------------------------------------------------xxxxxx ------------------------------------------------

हा लेख महाराष्ट्र टाइम्स मधेही प्रकाशित झाला होता. या किल्ल्यांबद्दल अजून यथासांग माहिती आपण खालील दुव्यांवरून मिळवू शकता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ - साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ - मांगी- तुंगीजी


सागर शिवदे 
sagarshivade07@gmail.com
9975713494

गुरुवार, २० जून, २०१३

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

 गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. 

आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते. पहिली गोष्ट आवडीतून गरजेत कधी रूपांतरित होते हे कळतच नाही पण दुसरी गोष्ट गरज बनावी अशी काही परिस्थिती अजूनतरी पुण्यात नाही.
आता जेव्हा पूर्वी पानशेत धरण फुटले होते तेव्हा लोकांनी घरातील वाहून गेलेलं सामान (गरज म्हणून) पोहत पोहत जाऊन पकडून आणले होते प्लस वाहून गेलेल्या लोकांना शोधण्याच्या मदतकार्यात हि ते (गरज म्हणून) होते हा भाग वेगळा.

असो, सांगायचा मुद्दा हा की,  एकदा का तुम्ही सायकल शिकलात की पुढच्या आयुष्यभर त्या दोन पायांना जी काही भिंगरी लागते की शेवटी या दोन पायांखेरीज तिसरा आधार म्हणून काठी आली की ती थांबते. पण पोहोण्याचे मात्र तसे नाही .
आता मी पण पोहोण्याचा क्लास जॉईन केला तो हि गरजेपोटीच. तेव्हा करियर ची एकंदरीतच बोंबाबोंब. त्यामुळे नौदलात जाऊ असा विचार करून अस्मादिकांनी कॉलेजातील 'NCC' नावाचा प्रकारात आपले नाव नोंदवले. कोणीही फालतू माणूसही भारतीय सैन्यात जाऊ शकतो असे आम्हाला कळले असल्याने आपली वर्णी सहज लागेल असा आत्मविश्वास.

या 'NCC' पेक्षा भिकार या जगात अजून दुसरी गोष्ट आहे यावर माझा विश्वासच नाहीये. आता हे निरीक्षण अर्थात तेथे काही दिवस जाऊन आल्यानंतरचे आहे. काही गोष्टी मला अजूनही नाही कळाल्या त्या अश्या की,
१. सगळ्या लोकांची डोकी भुंडी का असतात? जरा बरे केस असलेला आणि व्यवस्थित भांग बिंग पाडलेला माणूस या लोकांना का पचत नाही?
२. प्रत्येक गोष्टीला बेडूक उड्या मारणे किंवा लोळत क्रॉलिंग करणे हीच शिक्षा असू शकते का?
३. एकाही शिवी न देणारा ( आणि दिलेली ऐकून न घेणारा) माणूस किती दिवस येथे टिकू शकतो?

हे हि असो, तर कहाणी होती आमच्या पोहोण्याची. NCC मध्ये गरजेचे म्हणून आम्ही पोहोण्याचा क्लास लावला. बरोबर १ महिन्याने त्यांची पोहोण्याची परीक्षा होणार होती आणि ती पण ५० फुटी तलावात. आता पाण्यात पडल्यावर ते पन्नास फुटी खोल असो व दहा फुटी काय फरक पडतोय? पण या लोकांना भारी हौस मिरवायची.

पूर्ण एक महिना क्लास ला जाऊन 'शेवटी' म्हणजे क्लास चे पैसे संपायच्या शेवटी आम्ही कसेबसे हातपाय झोडत पाण्यात तरंगायला लागलो. आता आमचा कोन्फीडन्स का काय म्हणतात ते भलताच वाढला होता. शेवटचे काही दिवस तर आम्ही  'भाड्याने' आणलेल्या (म्हणजे भाडे देऊन आणलेल्या, गैरसमज नको !") उसन्या, पोहायच्या टोप्या आणि गॉगल लावून पोहू शकत होतो.

अखेर तो दिवस उजाडला जेव्हा आमची परीक्षा होणार होती. शे दीडशे लोक जमली होती एका ठिकाणी. लगेचच म्हणजे दीड तासाने मिलेटरीचे तीन ट्रक आले. मग भाज्या कोंबतात तसे आम्हाला कोंबून ते ट्रक निघाले. मिलेटरीचे मळके पट्या-पट्या चे शर्ट घालून आलेले ती लोक जेवढा करता येईल तेवढा मग्रूरपणा  करीत इतर लोकांना 'हाकत' होते. 

आता पोहोण्याची परीक्षा देण्यासाठी आम्ही तलावात उतरलो. ३०० मीटर तलावात ३ फेऱ्या मारून एका ३० फुटी भागात फ्लोटिंग करायचे होते. 
अस्मादिकांची हि पहिलीच परीक्षा असल्याने आम्ही पोहोण्याचा चष्मा, टोपी वैगरे घालून तयार. माझ्या बरोबरीच्या लोकांना अचानक न्यूनगंड का काय ते वाटायला लागले असावे. एकंदर माझी तयारी आणि हौस बघून हा "भारी स्विमर" असेल असे लोकांना वाटले. मी फुल टू टोपी-बिपी गॉगल घालून. पण खरी परिस्थिती नंतर लोकांच्या लक्षात आली. 

हि पोहोण्याची स्पर्धा नव्हती.  फक्त ३ फेऱ्या पूर्ण करून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते. पण शेवटचा माणूस फेरी पूर्ण करून जेव्हा फ्लोटिंग ला येईन तेव्हापासून दहा मिनिटे फ्लोटिंग करायचे होते नाहीतर फेल. 

फ्लाग उडाला आणि सगळी लोक पोहायला चालू झाली. सगळी इतर मुले 'बटरफ्लाय' व 'गावठी' पोहोत होती.ती सपासप पोहत पुढे निघून गेली. मी मात्र नुकतेच शिकलो असल्याने 'ब्रेथ स्ट्रोक'मारत हळूहळू. पोहत जेव्हा मी अर्ध्या अंतरावर आलो तेव्हा काही लोक ती फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीसाठी पोहत होती. 
काही वेळ पोहल्यानंतर माझे तलावाच्या बाहेर लक्ष गेले. एक गार्ड माझ्या पोहोण्याच्या स्पीडने वरती चालत होता. की कधी हा माणूस बुडेल आणि कधी उडी टाकून याला एकदाचे बाहेर काढेन या उद्देशाने. 

पहिल्या फेरीतच मला दम लागलाय हे पाहून तो म्हणाला की "टेक युवर ओन टाइम". 
हे वाक्य मी इतके मनावर घेतले की माझा वेग अजून कमी झाला. मी दुसऱ्या फेरीसाठी निघालो तेव्हा काही लोक फ्लोटिंग पर्यंतही पोहोचली होती. 

वेळ माहीत नाही पण बऱ्याचं वेळाने मी फ्लोटिंग ला पोहोचलो. अंगातला जीव तर गेलाच होता. पण येथे जर मी हातपाय गाळले असते तर गॉगल आणि टोपी सकट माझा "टायट्यानिक" झाला असता. आणि माझे सोडा पण ज्यांची चष्मा, टोपी मी आणली होती त्यांच्या आत्म्यालाही  शांती लाभली नसती. 

मी पोहून गेलो आणि फ्लोटिंग ची वेळ चालू झाली. जी लोक लवकर पोहोचली होती त्यांच्यावर माझ्यामुळे २५  मिनिटांपेक्षा जास्त वेळ तरंगत राहायची वेळ आली होती. काही मस्तपैकी पाण्यात उलटी झोपली होती. काही नाईलाजाने तरंगत होती. काही पाण्यात काहीतरी हरवलेय असे काहीतरी करीत होती. तर माझ्यासारखे नवशिके ज्यांना पोहणे शिकवले होते पण तरंगणे नाही, असे लोक जीवाच्या आकांताने हातपाय झोडीत होते. 
काहींना एवढा वेळ तरंगणे न जमल्याने काहींनी तलावाच्या कडेला पकडले आणि नापास झाले. 

मी तरंगायला चालू केले आणि पुढची ती दहा मिनिटे माझ्या आयुष्यातली मी कधीच विसरणार नाही. मिनिटा-मिनिटा गणिक माझे हातपाय झोडणे कमी होत होते. अंगातली शक्ती संपली होती. बाहेरचा माणूस आठ, सात, सहा, पाच गणती करत होता. तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांची गणती करतोय असे वाटू लागले. 
आता आकडा चारवर आला. एका वेळेला वाटले, गेले उडत करियर-बिरीयर. आपण जगलो तर करियर होईल ना? मोठ्या कष्टांनी तलावाच्या शेजारचा पाइप धरायला हात पुढे केला. पाइप धरला की नापास हे तेथेही आठवत होते.
तो 'तीन' म्हणाला. मी पाइप धरायला गेलो आणि एकदम मागील महिन्यात या पोहोण्यासाठी केलेले क्लास, त्याचे पैसे सगळे आठवले. म्हटले बस्स, आता नापास झालो तर येथून बाहेर आणि हे सगळे एफर्टस वाया. 

देवाचे नाव घेऊन उरलेले त्राण गोळा करून मग मी जे काही अशक्य हातपाय झोडले ते पाहून पिसाळलेल्या गाढवाला सुद्धा 'कॉम्प्लेक्स' आला असता. 
लगेच "फिनिश" असा शब्द आला आणि मी सुस्थ पडलो. मला त्या तलावाच्या बाहेर कोणी काढले हेही मला आठवत नाही. मला राहून राहून आजही वाटते की माझी हि एकंदर परिस्थिती बघूनच तीन ते एक अंतर लवकर काटले गेले असावे. 

मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मी पास झालो होतो पण माझ्यामुळे जास्त वेळ तरंगायला लागल्यामुळे आणि ते न जमल्याने तीन मुले नापास झाली होती. बरे झाले की मी गॉगल घातला होता की त्यामुळे मला त्यांच्याकडे काणाडोळा करता आला. कुठल्याही क्षणी ती आपल्याला पकडून परत तलावात टाकतील असे मला वाटायला लागले. 

गॉगल, टोपी घालून पोहोण्याआधी मी लोकांना 'मायकेल फेल्प्स' वाटलो होतो म्हणे, पण नंतर माझी पत पार्ट-टाइम 'वाघ' होणाऱ्या 'राहुल रॉय' एवढीही शिल्लक नव्हती. दुसऱ्या दिवशी मी तो उधारीचा चष्मा आणि टोपी देऊन टाकली.

तेथे पास होऊन मी NCC जॉईन केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षात सोडली. ते जर तेव्हा सोडले नसते तर मी अजूनही 'सावधान, विश्रामच' करत बसलो असतो.  आता स्वतः "विश्राम" करत लोकांना सावधान करण्याचे काम करतोय ते काय वाईट?

भविष्यात, मी जर माझे वर्तमानपत्र चालू केले(च) तर मी रोज(च) दोन(च) बातम्या हेडलाईन म्हणून(च) छापेन(च).
१. NCC पेक्षा भिकार जगात काहीच नसून सुज्ञांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. 
२. सिंहगडावर जाणारा गाडीरस्ता कालच्या मंद लहरी भूकंपांनी नामशेष. आता सिंहगड चढून जाण्यासाठी पर्याय नाही.

त्यानंतर बऱ्याचं वर्षांनी फिटनेस साठी म्हणून पोहायचा क्लास लावला. पोहता येते म्हणून पहिल्याच दिवशी 'स्विमिंग टेस्ट' द्यायला मी परत पाण्यात उतरलो. पूर्ण एक तास प्रयत्न करूनही मला पोहता आले नाही. "आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे." हे वाक्य माझ्या बाबतीत मात्र चुकीचे ठरले होते. दुसऱ्या दिवशी मी गप्प माझे रजिस्ट्रेशन रद्द केले आणि उरलेले पैसे परत घेऊन आलो. 

आता मी चुकूनही पोहोण्याच्या नादी लागत नाही.समुद्रकिनारी गेलो तरी जास्त रमत नाही. हुशारीने पावसाळ्यात मुंबईला जात नाही. "मी मासा असतो तर" अश्या आशयाचे निबंध हि वाचणे मी आता बंद केले आहे. डिस्कवरीवरची माणसे समुद्रात पोहायला लागली की, मी वाहिनी बदलतो आणि अन्नू मलिकची हिडीस गाणी लावतो.
"उची है बिल्डिंग, ट्या नाआआअ "
लिफ्ट तेरी बंद है ट्या नाआआअ "

( दुःख पचवायला हो ! कारण अस्मादिक कोणतेही व्यसन करत नाहीत.आणि म्हणतात ना "लोहे को लोह काटता है".)
असो, पण हा एवढा छोटा प्रसंग, माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला.

सागर

शुक्रवार, १४ जून, २०१३

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

माझ्यासारख्या मवाल्याचा सज्जन मित्र

काही लोक पहिल्या भेटीत आपल्याला कशी वाटतील व भासतील, हे त्या लोकांच्या राहणीमानाप्रमाणेच आपल्या स्वतःच्या नजरेवर अवलंबून असते. काही लोक बाह्यरूपी दिसताना मवाली दिसत असतात, वा बघणारा स्वतःला सोडून इतरांना मवाली गणत असतो. पण कोणाचे नशीब कशी चाल खेळेल सांगता येत नाही, आणि अश्या लोकांबरोबरच आपल्याला अनेक वर्षे काढावी लागतात. कधी नाईलाजाने तर कधी मित्रत्वाने. 
त्याचे तसे राहणीमान कदाचित त्याची मजबुरी असू शकते पण आपली दृष्टी म्हणजे आपल्या मनाचा आरसाच होय. ज्या कोनातून त्यावर सूर्यकिरणे पडतील त्याच कोनातून ती ते परावर्तित करणार. आपणच त्याला मवाली ठरवून मोकळे होतो.

आता जरा या या दोन व्यक्तिरेखांची अदलाबदल करूयात. 
मी पहिल्या भेटीपासून कोणालातरी मवाली वाटतोय याची मी कधीच कल्पना केली नसेल. नावाप्रमाणेच तसा मी एकदम सुज्ञ. सरळमार्गी आणि सरळतोंडी. सरळ तोंडी हे अशासाठी की जे तोंडात येईल ते सरळ सरळ बोलून मोकळे होतो. त्याला मी मवाली कशामुळे वाटलो हे त्यालाही आज सांगणे अवघड आहे.

बारावीत पहिल्यांदा सौरभला भेटलो. गोरा गोमटा, थोडासा लाजाळू.
कशी ओळख झाली आठवत नाही, पण आठवतो "तो" दिवस.
नुकतेच कॉलेज सुरू झालेले, काही काम ना  धाम, बोंबलत हिंडत होतो आम्ही सगळे. त्या दिवशी त्याची बहीण त्याला घ्यायला आली होती. तिने त्याला माझ्याबरोबर पहिले आणि घरी जाऊन त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.
"अश्या मवाली मुलांबरोबर अज्जिबात राहायचे नाही हा सौरभ !"

का कसे ठाऊक नाही, त्यानंतरही आमची मैत्री टिकली.पण, माझ्याविषयीचे हे जहाल मत अजून जहाल व्हायला अजून दोन तीन प्रसंग घडले.

मिड टर्म परीक्षा होऊन पुढची टर्म चालू झाली होती. रिझल्ट केव्हाही लागू शकतो असे दिवस. साडेचार-पाच ची वेळ. आज सौरभ काही कॉलेज ला आला नव्हता. एकाने नवीन मोबाईल घेतल्याने त्यावर किडे करण्याचे पहिले प्रात्यक्षिक म्हणून मी सौरभ ला फोन केला.
"रिझल्ट लागला आहे आणि बेक्कार रिझल्ट आहे. पुढच्या दहा मिनिटात कॉलेजला ये" असे म्हणून मी फोन ठेवला. त्याचा दुसऱ्या कोणालातरी फोन होईल मग त्याला खरे सांगू म्हणून आम्हीही निवांत.
पुढच्या आठ मिनिटात सौरभ कॉलेजात उभा!,
हॉल तिकीट सापडले नाही म्हणून तो आख्खी फाइल घेऊन आला होता. गाडी नव्हती म्हणून त्याने पुढच्या मिनिटाला बहिणीला फोन लावला. बहीण बँकेत कामाला होती. तिने तातडीची रजा (हाफ-डे) घेऊन बँकेतून निघून सौरभ ला घरून घेऊन कॉलेज मध्ये सोडले.
तो खरंच खूप टेन्शन मध्ये आला होता. आणि आम्ही दात काढत निवांत पडलो होतो.

रिझल्ट नाही ना लागला?
नाही!
मग ............................................. !!!!!!!

पुढच्या संभाषणात काहीही अर्थ नव्हता.

"माझे सोड रे…  माझी बहीण गेट बाहेर थाबलीये, आणि हाफ-डे घेऊन आलीये ती."

त्याचा (भयानक) चेहरा भयानक असा पडला होता. चेहऱ्यावर नामुष्की आणि डोक्यात आता बहिणीला काय कारण सांगायचे असा विचार करतच तो बाहेर पडला. बाहेर जाऊन त्याने "रिझल्ट देणे बंद केले आज" असे सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे साहेब रिझल्ट न घेता  घरी गेले तेव्हा खरे काय ते कळले.

एक दिवशी हे साह्येब एका मुलीकडून पुस्तक घेण्यासाठी थांबले असताना मी हि त्याच्याबरोबर थांबलो होतो. जसे ती पुस्तक घेऊन आली तसे मी तेथून निघायला लागलो. आणि तेही गुपचुप नाही तर आरडा ओरडा करत.
"येड्या, मजा आहे बाबा एका मुलाची, मी निघतो बाबा, उगाच कबाब मी हड्डी नको"
असे अनेक टुकार डायलॉग मारून त्याला इतका भंडावून सोडला की नंतर तो तिच्याशी काय बोलला हे त्याला स्वतःला हि आठवत नाही.

नंतर, जसे येणेजाणे वाढले तसे दृष्टिकोनही बदलला.पण त्याच्या दृष्टीतला मवालीपणा मी तसाच बाळगून होतो.
असेच एकदा LAB मध्ये प्रयोग करताना त्याला ओळखणारी एक मुलगी त्याला "तू 'लय' घाई करतो रे" असे म्हणाली तेव्हा मी फुटून फुटून हसलो होतो दोघांच्या समोर. त्यावेळची त्याची "ऑकवर्ड सिच्युएशन" मला आजही लक्षात आहे.

पोस्ट ग्र्याज्युएशनला प्रवेश घेतला तेव्हा फॉर्म भरताना या साहेबांनी " Principle Signature" च्या जागीच सही ठोकून दिली होती. त्यानंतर जेव्हा प्रिन्सिपल सही ठोकायला गेला तेव्हा तेथे आधीच याची सही पाहून तो वेडाच झाला. आणि याला "… आणि तुला MCA करायचाय हम्म" अश्या शब्दांनीच ठोकला होता. ते "आणि" तो ज्या फ्रस्टेशनने बोलला त्या सगळ्याचा साक्षीदार मी,… तेथेही (प्रिन्सिपल ऑफिस मध्ये) पडून पडून हसलो होतो असे आठवतेय.

छोटा ट्रेक म्हणून ह्याला एकदा डायरेक्ट हरिश्चंद्राला नेले होते. त्याचा पहिलाच ट्रेक होता तो. जर तेथे 'कोकणकडा' नामक अद्भुत निसर्गरूप नसते तर तो त्याचा शेवटचा ट्रेक आणि आमच्या मैत्रीचा शेवटचा दिवसही  ठरला असता.

मध्ये बरेच दिवस गेले, तो 'मवालीपणा' पण कुठे अदृश्य झाला कुणास ठाऊक !

आता नोकरीला लागल्यापासून सगळ्या गोष्टी सभ्यतेत केल्या जातात. याच सभ्यते पोटी महिना महिना बोलणे होत नाही. कधी तरी चाटिंग करताना स्मायली पाठवूनच काय ते हसणे होते.
चष्मा लावलेल्या स्मायली पाठवणेच अधिक सोयीचे. त्याने डोळ्यातल्या या जुन्या आठवणी डोळ्यातून ओसंडून वाहत असल्या तरी दिसत नाहीत चष्म्यामुळे.

आजही मी मात्र त्याच्याबरोबर तसेच राहणे पसंत करतो. "मवाली" "मित्राप्रमाणे" .
जेणेकरून तेच जुने दिवस परत आठवतात आणि मनाला ओलावा देऊन जातात.

शुक्रवार, ७ जून, २०१३

टुकार मीशिभोबोची प्रभातवारी


टुकार मीशिभोबोची प्रभातवारी

या लोकशाही उत्पत ( उद्धट हि चालेल) देशात पोटासाठी कोण काय करेल सांगता येणे 'लै म्हणजे लैच' अवघड आहे. कोण पोटासाठी काकडीच्या साली काढून काकडी बरोबर सालीही विकत, तर कोण त्या काकडीच्या सालापेक्षाही फालतू सिनेमे काढून लोकांच्या भावनेचे भांडवल करून स्वतःचे पोट भरत. 

येथे आता या दुसऱ्या टुकारगिरी विषयी लाक्षणिक विवेचन होणार आहे. कोणाला पटेल न पटेल. पण "कुत्ता जाने, चमडा जाने" अश्या ( उदात्त!)  हेतूने लिहायचा प्रयत्न आहे.

असो, तर घडले असे की, बऱ्याचं दिवसात 'चांगला' सिनेमा पहिला नाही असा सगळ्यांचा सूर निघाला. मग लोकांची मते घेऊन कुठल्यातरी सिनेमाला जाऊ असे ठरले. 
मग कुठून माहीत नाही पण 'एक' नाव कळले. हा सिनेमा म्हणे तुफान चालला होता. थेटरच्या बाहेरून 'तुफान चाललाय' असे काही वाटले नाही.  पण वाटले की आत पहिल्यांदा पिच्चर मधली माणसे एकमेकांना बेफाम बदडून काढत असावीत आणि नंतर तिकीट काढून अश्या टुकार पिच्चरला तुझ्यामुळे  आलो म्हणून प्रेक्षक एकमेकांना बदडून काढत असावीत.
मी स्वतःच्या जबाबदारी वर आत गेलो आणि मित्राकडून बदडून घ्यायचाच बाकी राहिलो.

पिच्चर तर ठरला पण आता जायचे कुठल्या थेटरात? एक म्हणाला कोथरूड सिटीप्राईड ला जाऊ.  पण म्हटले 'मीशिभोबो' बघण्यासाठी फारतर २० किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे  ३० रुपडे ठीक आहेत. दीडशे रुपडे घालवायच्या लायकीचा पिच्चर तरी असतो का त्या 'मांजरीचा' ?

मग त्या दिवशी आमची उभ्या वीस वर्षात न झालेली 'प्रभात' वारी घडली. 

एक मित्र पहिल्यापासूनच नाखूष होता. "कुठेही आणता मला तुम्ही" असेच भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. आख्खे ३० रुपडे मोजून तो पहिल्यांदाच अश्या मराठी पिच्चर ला आला होता. 

जसा पिच्चर सुरू झाला तसा एक टकला हीरो आला आणि मग जो येईल तो या टकल्याला घालून पाडून बोलू लागला. काही काळाने तो टकला वेडा झाला. नंतर एका IT पार्क मध्ये डांबरी रस्त्याने  घोडे धावताना दिसले. काही काळ असाच फालतूपणा झाला आणि मग शेवटाला तो टकला पेटला आणि मग त्याने सगळ्यांना हाणला आणि "मला रिस्पेक्ट द्या" म्हणाला". असे अगम्य काही तरी होते. ( या सगळ्यामागचा दाखवायचा, समजवायचा आणि खरा मूळ मुद्दा वेगळाच होता. )

त्यातला 'दाखवायचा' जो हेतू होता त्याने चित्रपट गृहातील माणसे चार्ज झाली होती. सगळ्यांना स्वभाषा, स्वधर्म अशी गोष्टीचा ताप आला होता. मिनटा मिनिटाला मराठीच्या महानतेचा घाम फुटत होता. पण त्यातून 'समजण्याचा' व बोध घेण्याचा मुद्दा लक्षात घेण्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते. 

तो टकला तेथे पेटला होता तर, माझ्या शेजारी माझा हा मित्र पण पेटला होता, पण दुसऱ्या मुद्द्यावर. तो मिनटा मिनटाला फ्रस्टेट होत होता. वास्तविक हा आमचा मित्र उत्तम कविता करतो, उत्तम वाद्ये वाजवतो, स्टेज शो हि करतो.जाहिरातींना आवाज देतो. आणि हे सगळे मराठीतच. त्यामुळे त्याचे मराठीवरचे प्रभुत्व वादातीत आहे. पण त्याला जो काही समोर भाषेचा बाजार मांडला होता तो बघवत नव्हता. बराच वेळ तो आमच्यातच कमेंट देत होता.

शेवटी एका प्रसंगात, सामान्य मराठी माणूस म्हणवणाऱ्या माणसाची मुलगी कॉलेजाच्या ग्यादरिंग मध्ये लावणी का आयटम सॉंग ( का सोंग) करायला लागली.
हा मध्येच उठून उभा राहिला आणि आम्हाला जोरजोरात ओरडायला लागला. 
ती तिथे पेटली होती आणि हा इथे. 
" कसल्या भंगार पिच्चर ला आणता रे मला तुम्ही?? आत्ताच्या आता माझे तीस रुपये परत द्या. फुकट तीस रुपये घालवले माझे वाया. त्यापेक्षा मी ते भिकाऱ्याला दिले असते. "Big smile

आम्ही  ओढून त्याला खाली बसवला. त्याला म्हटले "शांत बस बाबा, लोकांना इथे मराठीचे स्फुरण चढलेय, हाणतील तुला इथेच!"

तो नाईलाजाने बसला. 
नंतर पुढच्या प्रसंगात तीच नाचणारी मुलगी घरी कॉम्पुटरवर पडल्या पडल्या, एका कॉलेज ची वेबसाइट ह्यॅक करते म्हणे. Big smile Laughing out loud
आता मला खरी मजा यायला लागली. माझा हाच मित्र 'एथिकल ह्यॅकींग' शिकला असल्याने तो हे पाहून संपलाच. तो ताडकन उभा राहिला. 

"च्यायला बापाची वेबसाइट आहे का घरबसल्या ह्याक करायला? काहीही दाखवतात का हे साले? अरे वेबसाइट ह्याक करायला इंटरनेट लागते का नाही हे तरी माहीत आहे का ह्यांना? सिम्पली रीडीक्युलस "
त्यानंतर तो पाच सहा टेक्निकल शब्द टाकून 'ह्याने हे होते का?" त्याला हे लागते का?" लोक बघतात म्हणून काहीही दाखवतात का हे लोक?" असे किंचाळू लागला. ते टेक्निकल शब्द ऐकून त्याच्या शेजारच्या माणसाने हातातल्या पुरचुंडी मधले सगळे पोपकोर्न  पोटात ढकलले. (स्वतःच्या !)

तो थेटराबाहेर निघून गेला. आम्ही पिच्चर संपवून बाहेर गेलो तर गाडीवर बसला होता.
"तुम्ही सगळे मिळून माझे तीस रुपये परत द्या, नाहीतर जाऊ देणार नाही" असे म्हणत त्याने आमच्या गाड्याच पकडून ठेवल्या होत्या.

हा पिच्चर "टकल्याची अ‍ॅक्शन-पब्लिकला घाम" म्हणूनही खपला नसता हो !
यातला 'पब्लिकला घाम' हे ठीक (कारण तो आलाच होता)  पण तो टकला 'अ‍ॅक्शन' पण नव्हता करत हो (स्माईल)
थोडा वेळ (डायरेक्टर ने सांगितल्यामुळे) लाचार झाला, मग वेडा झाला, मग भक्त झाला, मग भाई झाला आणि मग राजकारणी झाला.आणि उरलेल्या वेळेत भिकार डायलॉग मारत बसला. बाकी सर्व प्रसंगात डायरेक्टर स्वतःच ( रात्रीची जरा जास्त(च) झाल्यासारखे डोळे करून आणि शेरवानी घालून) (घोड्या)समोरच हंटर घेऊन बसला होता.  (स्माईल)


तो मी बघितलेला शेवटचा मराठी पिच्चर असावा .परत कधी ह्या मित्राच्या शिव्या ऐकायची हुक्की आली की त्याच पिच्चरच्या दिग्दर्शक म्हणविणाऱ्या माणसाचे इतर पिच्चर पाहायची ऑफर आम्ही त्याला देतो. आणि मग भगीरथाने गंगा आणावी तसे हजारो ऐकिवात नसलेले मराठीतील अवजड असे (अप)शब्द वायू वेगाने एका नंतर लगेच एक असे ऐकायला मिळतात. 
खरंच,  मराठी भाषा ही शब्दसंपन्न भाषा आहे. हे तेव्हा आम्हाला स्मरते. Big smile

(तळ)टीप :
१. चांगला' सिनेमा : हि व्याख्या व्यक्तीसापेक्ष होऊ शकते.
२. लेखन (वाचणाऱ्याला वाटले नाही तरी(ही)) विनोदी प्रकारातील आहे. येथे कोणत्याही चर्चा, अपमान व अभिमान अपेक्षित नाही.
३. टीप वरती का नाही लिहिली हे विचारू नये. उत्तर मिळणार नाही. ( कारण, याचे उत्तर लेखकाकडे(ही) नाही)

सोमवार, ३ जून, २०१३

चाळीस मिनिटांचा किल्ला,सतरा तास प्रवास : अर्नाळा किल्ला

अर्नाळा किल्ला

हौसेला मोल नसते हेच खरे. या हौसेपोटी कोण काय करेल सांगता येत नाही. आम्हीही मे महिनातल्या कडक उन्हामुळे संपावर गेलेल्या आमच्या ट्रेकर मंडळींना हौसेने या ट्रेक साठी निमंत्रण दिले. एकंदर ऊन आणि ठिकाण पाहता त्यांनी निमंत्रण आणि मी दोघांनाही धुडकावून लावले.
पण येथे आमची हौस उफाळून आली, आणि  भूषण चा पेटंट "जे येतील त्यांच्या बरोबर, नाही येतील त्यांच्या शिवाय, ट्रेकला जायचेच" असा डायलॉग मारून आम्ही निघालो.

जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणतात ना,अगदी तसेच झाले. चाळीस मिनिटाच्या किल्ल्यासाठी तब्बल सतरा तास प्रवास करून मी परत जेव्हा पुण्यात आलो, तेव्हाच ठरवले की, आता यापुढे जरी कदाचित पोर्तुगीजांची सत्ता आली, आणि त्यांनी हा किंवा विरारला दुसरा नवा किल्ला बांधून त्याच्यासाठी "महान(!!) ट्रेकर(!!)" म्हणून मला बोलावले, तरीही मी विरार ला परत पाऊल ठेवणार नाहीये. अगदी त्यांच्या देशाच्या ग्रीन कार्ड चे आमिष दाखवले तरीही नाही. नाही म्हणजे नाहीच :)

दोन महिन्यापूर्वी खांडस ते भीमाशंकर ट्रेक केल्यापासून पुढचे दोन महिने घरातून बाहेरच पडलेलो नव्हतो  भटकंतीसाठी. आता ऊन हि बेक्कार असल्याने जास्त दमवणूक करणारा ट्रेक नको म्हणून मग मोर्चा जलदुर्गांकडे वळवला. म्हणून मग एका दिवसात जाऊन येता येईल अश्या अर्नाळा किल्ला जायचे ठरवले.


ऐतिहासिक संदर्भ : 
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

भौगोलिक संदर्भ :
मुंबई च्या पश्चिम भागातील विरार या स्टेशन पासून जवळपास १० किमी वर अर्नाळा हे गाव आहे. त्याच्या पुढे अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे. वैतरणा नदी ह्या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या किल्ल्यावरून नजर ठेवता येत असे.


गूगल नकाशे वरून घेतलेल्या चित्रात चौकोनी किल्ला दिसत आहे. किल्ल्याच्या बाजूला सध्या बरीच वस्ती वाढली आहे.

किल्ल्याचा नकाशा :
आंतरजालावरून साभार 

बघण्याची ठिकाणे आणि सद्यस्थिती : 
 अर्नाळा गावापासून चालत १०  मिनिटे आपण समुद्र किनारी येतो. तेथून समोरच अर्नाळा बेटाचे  दर्शन होते. अर्नाळा किल्लाला दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी असून तटबंदीमध्ये असलेले ८ बुरूज किल्ल्याच्या अभेद्यतेची साक्ष देतात. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. तसेच हाजीअली आणि शहाअली यांची थडगीही आहेत.  किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. याशिवाय किल्ल्यात गोड्यापाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे.
पुण्यावरून जाऊन, सोळा सतरा तास प्रवास करून हा चाळीस मिनिटांचा किल्ला पाहण्यात वर्थ नाही असे मला वाटते 

आमचा ट्रेक अनुभव :
नेहमीप्रमाणे सकाळची सिंहगड पकडून कल्याण ला उतरलो. आजचा दिवस काही खास नव्हता बहुतेक. घरातून निघतानाच उशीर झाला, मग (गाडीच्या) जीवाच्या आकांताने धडपड ( घरघर) करीत शिवाजीनगरला पोहोचलो. तेथे पाऊल ठेवले तोच कानांना काही उच्च स्वरातील शब्द ऐकू आले. यानंतर तिकीट काढून कल्याण ला उतरेपर्यंत वेगवेगळी स्टार कास्ट असलेली बरीच भांडणरूपी चलचित्र मी पहिली. 
भूषण भेटला आणि निघालो कोपरला. तेथेही १ तास पुरतील एवढी माणसे तिकीट रांगेत आणि त्यात गाडी ४० मिनिटे लेट.
तेथून निघून उतरलो विरारला. रविवार असून हि एवढी लोक भर उन्हात कुठे भटकत आहेत हे काही उमजेना.कालच भूषण म्हणाला होता की विरार ला खूप गर्दी असते.स्टेशनमधून बाहेर जाऊन बस पकडली.
एव्हाना साडे बारा झाले होते आणि साडे बाराला शेवटची बोट असते असे ऐकले होते, म्हणून तेथून पळतच सुटलो. नशिबाने ती शेवटची बोट दिसली. ती पकडली आणि पुढच्या पंधरा मिनिटात किल्ल्यात पोहोचलो.

आता एक वाजलाच होता म्हणून किनारी उतरून लगेच कालिकामातेचे मंदिर गाठले. तेथे थोडी सावली होती आणि मस्त गार हवा होती. तेथेच जेवण करून घेतले आणि मग वामकुक्षी साठी टेकलो.
 तरतरीत झालो आणि फोटो चालू झाले. बसल्या जागेवरूनच हा पहिला फोटो काढला. पांढरा सिंह पाहून लहानपणीचे ( म्हणजे मी लहान असतानाचे) पेशवे पार्क आठवले. तेथेही पांढरा सिंह होता.( जगाच्या पाठीवर कुठेही जा, एकदातरी जुन्या पुण्याविषयी हळहळ व्यक्त झालीच पाहिजे. :) )


हेच ते कालिकामातेचे मंदिर. स्थानिक लोकांची या देवीवर खूप श्रद्धा आहे. अनेक वादळे व संकटे येतात, कधी बोटी बुडतात, पण हि देवी सगळी संकटे टाळते असे त्याचे विचार जाणवले.


येथे बोटीच्या प्रतिकृतीतच तुळस लावली होती.


 मंदिराच्या आवारातच किल्ल्यातील एक तोफ आणून सिमेंट मध्ये फिक्स केली आहे.

किल्ला म्हटले की तेथे हनुमानाची मूर्ती हि हवीच.


काही मुले तेथे उनाडक्या करीत होती, पण  दूरवर पसरलेली खाडी लक्ष वेधून घेत होती.


आता निघालो किल्ल्याच्या दिशेने.
तटबंदी ला लागून जाणाऱ्या रस्ताने पुढे निघालो. आणि दोन प्रचंड आणि भक्कम अश्या बुरुजांमध्ये कल्पकतेने लपविलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दृष्टीस पडले.


बाहेरूनच किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि समोर विस्तीर्ण खाडी दिसत होती.



थोडे जवळून बघितल्यास त्याच्या अभेद्यतेची जाणीव होते. असे मोठाले दगड येथे बेटावर कसे आणले असावेत?

या प्रवेशद्वारावरच हत्ती आणि सिंह यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.


बरोबर मध्यभागी हा शिलालेख कोरलेला होता. आंतरजालावर त्याचा असा अर्थ सापडला.
'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'
या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो.


या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आतून हा मस्त फोटो आला. येथून उजवीकडे अजून एक दरवाजा होता. येथील स्थापत्यकला वसई किल्ल्याशी बरीचशी मिळती जुळती होती.


आत आल्यावरही अनेक ठिकाणी कोरीवकाम आणि कारागिरी केलेली दिसली.

हे कोरीवकाम छतावर केलेले होते.
आता माझ्यासारखा कारागीर असता तर म्हणाला असता की "छतावर 'वर मान' करून कोण बघतंय ? आणि तसेही मान वर करून बघण्याचे असे किती प्रसंग सामान्याच्या आयुष्यात येतात ? काही नको छतावर कोरीवकाम"


याच दारातून आम्ही आत आलो होतो. तेथून डावीकडे वळून वरती तटबंदी वर चढलो.

येथे एक राजवाडा होता असे वाचनात आले. त्याचे भग्न अवशेष दिसत होते.

बघता बघता पहिल्या बुरुजावर आलो. येथे अनेक खंदक खोदलेले दिसत होते. बाहेरून एक दिसणारे खंदक आत बघितले असता तीन मध्ये विभागले होते. किती प्रमाणबद्ध आणि डिटेल काम केले होते बांधणाऱ्या कारागिराने.


येथून एका स्तूपासारखे  काहीतरी दिसले.


 तटबंदी वरून चालत सुटलो. सगळीकडे अख्खा किल्लाभर स्थानिकांनी मासळी सुकवण्यासाठी टाकली होती. त्यावर पाय देऊन जावे लागत होते. हेच घाणेरडे मासे लोक आवडीने खातात.  अरेरे ! मुळात स्वतःचे पोट भरण्यासाठी दुसया सजीवाचा जीव घेणे हे मला पटत नाही. असो. पोटासाठी लोक काही(ही) करू शकतात.
 


आता दुसऱ्या बुरुजावर आलो. येथून किनारपट्टीचे नेत्रसुखद दृश्य पहिले.

  
येथून खाली अमृतेश्वर मंदिर आणि अष्टकोनी तलाव दिसले.


किल्ल्याबाहेरील शेती

 तिसरा बुरूज:

किल्ला चारही बाजूनं पाण्याने वेढला असल्याने सर्व बाजूंनी खाडीच दिसत होती.

येथून तटबंदी वरून खाली जाण्याचा मार्ग होता.

चौथा बुरूज :
 जरा वेळ निवांत टेकलो.

 किल्ला पाहून या बुरुजावरही जायचे होते.

दूरवर नारळ पोफळीची झाडे पसरली होती.



येथेही एक खंदक खोदलेला दिसला, भूषण तेथून आत गेला तर यातून चक्क खाली जाणारी भुयारी वाट होती. कॅमेराचा फ्ल्याश मारत तेथून खाली उतरलो.


या खंदकांमध्येही प्रकाशाची नैसर्गिक व्यवस्था केली होती.

तेथून उतरलो ते डायरेक्ट या दरवाज्यानेच बाहेर ( खाली ) आलो.


किल्ला आता पाहून झाला होता. दर्ग्यात काही गेलो नाही. थोडा वेळ झाडाखाली झोपलो आणि सरळ बाहेर निघालो.
थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. याची उंची ३६ फूट असून  जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. बुरजातून फुटलेले झाड पकडून हौशी माणसे जाऊ शकतात. त्याच्या पायथ्याशीही खंदक खोदलेले दिसले पण ते बुजलेले होते.

वसई किल्ल्यातून एका चर्च मधून निघणारा एक भुयारी मार्ग समुद्राखालून या बुरुजाशी येतो असे काही लोकांना त्याच्या पूर्वजांकडून कळले.



येथे एक गावकरी भेटला त्याच्याकडून काही माहिती मिळाली.
सध्या गावात तीन ग्रुप पडलेले असून एक धनिक, एक सरकारी आणि एक खालच्या जातीतील लोक. धनिक लोकांकडे पैसा असल्याने ते गावात राजकारणे करतात. आणि  त्यांच्या विरुद्ध गेले की त्याला गावातून हुसकावून लावतात.
आधी अंधार पडला की गाव शांत होत असे. आता लाइट आली आणि रात्रभर मुलांचे टीव्ही बघणे आणि गाणी लावणे चालू झाले. राम नाईक नावाच्या राजकारण्याने आश्वासन दिल्यावर येथे १ वर्षात येथे लाइट आणली, पण त्यालाही सध्या कोणी विचारत नाही म्हणे.
त्याच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे ते जेव्हा येथे आले तेव्हा गोऱ्या लोकांची (पोर्तुगीजांची) सत्ता होती. गोरी लोक येथे रणगाडे घेऊन यायचे. ( तो रडगाणे घेऊन यायचे असे म्हणाला, आता पोर्तुगीज स्वतःचा देश सोडून इतके  मैल लांब नुसते रडायला का येतील हा प्रश्न मला पडला.पण नंतर कळले.)
आता या बेटावर रणगाडे इतक्या लांबून कसे आणले असतील आणि त्या काळातही ते किती प्रगत असावेत ह्या विचारात मी पडलो.
गावातील दैवत कालिकादेवी गावाला सगळ्या संकटातून वाचवते यावर त्याची श्रद्धा आहे.

आता निघायची वेळ झाली होती. परत बोटीपाशी येऊन थांबलो तर एक बोट आधीच निघून गेली होती. दुसरी  बोट आली आणि बूट न काढताच मी पाण्यातून चालत जाऊन बोटीत घुसलो.


किनारी दोन कावळे मस्त मासळी खाऊन पोट भरल्यामुळे गप्पा टाकत बसले होते.


कित्येक खेकडे आपला शेवटचा श्वास मोजत पडले होते.

हे बगळेबुवा मात्र मस्तपैकी बोटीच्या शिरोभागी बसून ऐटीत प्रवास करत होते. "उडण्याचा पक्ष्यांना पण कधीतरी कंटाळा येत असावा". लगेच पू.ल. आठवले.

काही कारण नसताना अश्या अनेक माशांची जीवनयात्रा संपली होती. याला मारून ( किंवा मरून) काय मिळाले असावे? न ह्याचा खायला उपयोग न कशाला. याचे जीवन माहीत नाही, पण मरण मात्र व्यर्थ गेले. बिचारा !

जाताना बोटीमध्ये जे  मच्छीमार लोक होते त्यांनी खेकडे पकडून आणले होते. त्यात एका बाईला हा मोठा दीड किलोचा असा खेकडा मिळाला होता. त्याच्या नांग्या बांधल्या होत्या. पण तो जिवंत होता. तो हातात घेऊन एक फोटो काढला. याची बाजारभावे किंमत चार हजार होती म्हणे, पण त्या बाईकडून ज्या व्यापाऱ्याने तो विकत घेतला त्याने तो फक्त सातशे रुपयांना घेतला. केवढी तफावत होती.


एक गोष्ट मनात आली, जीवन हे किती वर्सटाईल आहे. वरील सगळे प्राणी/पक्षीच. पण प्रत्येकाच्या जीवनाची वेगवेगळी फेज. सगळ्यात दुर्बल कावळे फक्कड जेवण झाल्यामुळे आनंदी, बगळा ऐटीत, खेकडे जीवनयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात, माशांनी (विनाकारण)तोडलेला श्वास, आणि सगळ्यात सबल मोठा खेकडा जिवंत असून त्याचे प्रभावी शस्त्र म्हणजे नांग्या बधून ठेवल्याने हतबल आणि पारतंत्र्यात.
दुसऱ्या किनारी पोहोचून किल्ल्याचे शेवटचे दर्शन घेतले. येथूनही तो ३६ फुटी बुरूज दिसत होता.


जाताना परत एक बोट चुकली, मग पुढे जाऊन बस चुकली, दुसरी मिळवून विरार ला गेलो. तेथे तब्बल एक  तास तिकीट रांगेत उभा !, वसई ची शेवटची ट्रेन गेली होती म्हणून पळत ट्रेन पकडली दादरची. तेथे पोहोचलो तर शेवटची सह्याद्री पण गेलेली. 
आठ वाजताची राजकोट-भुवनेश्वर पकडली आणि खऱ्या अर्थाने दिवस वाया गेला. ट्रेन मध्ये सगळी अशक्य माणसे भरली होती. कोण कुठेही बसलेय, कोणाचे पाय कोणालाही लागतायेत. कुठेही फडकी बांधून त्यात मुले झोपलेली. आणि पुण्याला येईपर्यंत ट्रेन मध्ये भांडणे चालूच होती. आजच्या दिवशी मी २०  पेक्षा जास्त  भांडणे पहिली. ओह, केवढा वेळ आहे लोकांना :) 
नंतर देहूरोडला काही तृतीयपंथी ट्रेन मध्ये येऊन लोकांकडून जबरदस्तीने पैसे घेत होते.मी मात्र काही पैसे दिले नाही.

ट्रेन मध्येच सनत जयसूर्याचा श्रीलंकेतील जत्रेत दुरावलेला त्याचा जुळा भाऊ मला दिसला. बिछडा भाई का काय म्हणतात ते. अगदीच सेम होता. त्याला मी म्हंटले की "९६ ला काय झ्याक खेळला रे सनत! कपच आणला त्याने एकट्याने!" तर तो "छुट्टा नाही है" असे बोलला. मग मी म्हणालो की "पण तो वकार युनुस तो बोल्या की, दादर से गाडी लेट हाय!" यावर तो खिडकीतून जो काही थुंकला त्याने तेथील फुलझाडांची पावसाळ्यापर्यंतची पाण्याची सोय झाली असावी. 

आता जवळपास अकरा वाजून गेले होते. कसाऱ्यापाशी ट्रेन ला आग लागल्याने घरचे काळजीने सतत फोन करत होते. साडे अकरा वाजता घरी पोहोचलो. 

किल्ल्याला जाताना बोटीने प्रवास करताना मी बूट काढलेच नव्हते. त्यामुळे पूर्ण बुटात पाणी गेले होते.  आणि तश्याच ओल्या बुटांनी दिवसभर फिरत होतो. घरी येऊन बूट काढले तर मोज्यांचा खतरनाक वास यायला लागला होता. मी तसेच ते खिडकीत ठेवले. आईने मात्र वेळीच प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ते धुवायला टाकले आणि उभा ( म्हणजे विरारहून पायाचे टळवे टेकतील एवढ्याच जागेत उभा राहून आलेला ) महाराष्ट्र 'देशी अ‍ॅनेस्थेशिया' च्या नवीन शोधला मुकला. 

असो. बाकी, अनुभव बरा होता, पण सोळा तास प्रवास करून तेथे जे काही पहिले ते एवढे वर्थ नव्हते असे वाटले. 

सागर