सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

अदभुत अविष्कार

अद्भुत आविष्कार 

निसर्ग हा खरेच अद्भुत किमयागार आहे. अश्या अनेक गोष्टींची निर्मिती त्याने अशी चुटकीसरशी केली की त्यांचे अस्तित्व आणि त्यांचे निर्माण यांचे रहस्य उलगडा करण्यात हजारो वर्षे कमी पडतील. त्या कश्या निर्माण झाल्या? कोणी केल्या? आणि का आहेत याचा काही केल्या थांगपत्ता लागत नाही. मग अश्या अनाकलनीय गोष्टींचे गूढ उकलत नसले की कालानुरूप त्या रहस्यावर धार्मिक रूढी वा अंधश्रद्धेचे टॉपिंग चढते.

निसर्गात कुठे कधी आणि काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. सर्व काही नशिबाचाच खेळ.  ते क्षण डोळ्यात आणि मनात साठवून घेणे एवढेच आपल्या हातात उरते. त्या गोष्टींचा ना कुठे शोध लागतो ना कुठे त्याची माहिती. अनुत्तरित असेच बरेच प्रश्न, भारावलेले मन, स्तब्ध कॅमेरे आणी डोक्याच्या खोल आडामध्ये शिंपल्यांप्रमाणे आत आत जाणारा एकच प्रश्न. "हे कसे शक्य आहे?"

इंटरनेटवर  क्षणात माहितीचा खजिना उघडून देणाऱ्या संकेत स्थळांच्या चेहऱ्यावर हि आठ्या येतात. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशीच त्याची पण भांबावलेली अवस्था. आपल्या आधी हे आविष्कार किती जणांनी पाहिले असावेत कुणास ठाऊक. त्यातून त्यांना काय बोध झाला असावा हेही वादातीत. डोळ्यांनी जे दिसते त्यावर विश्वास ठेवायचा असे मानले तर किती साऱ्या गोष्टीपासून आपण अनभिज्ञच. आणि हेच आविष्कार सत्य म्हणूनच पुढात उभे राहिले तर?

एका थिअरी प्रमाणे, एक 'पाय चार्ट' काढला आणि त्याचे असे काहीसे भाग केले.
१. मला माहीत आहे की हे मला माहीत आहे.(known knowns; there are things we know that we know.)
टक्केवारी : २% 
उदा. मला माहीत आहे की जेवायचे कसे हे मला माहीत आहे.

२. मला माहीत आहे की हे मला माहीत नाही.(known unknowns;there are things that we now know we don't know.) -
 टक्केवारी : ३%
 उदा. मला माहीत आहे की, 'विमान' कसे उडवायचे असते हे मला माहीत नाही.

३. मला माहीत नाही की हे मला माहीत आहे/नाही. (unknown unknowns – there are things we do not know we don't know.)  -
 टक्केवारी : ९५%
उदा. मला हे माहीत(च) नाही की ........


समजा, असे काही आविष्कार/चमत्कार दिसले की, आपल्या मनाची वाटचाल तिसऱ्या मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्याकडे होईल. तर?
अधिक सोपे करून, एखादी गोष्ट आहे, डोळ्यांना समोर दिसते आहे, डोक्याला लॉजिकली पटते आहे. पण त्याचा काही मागमूस लागत नाही.
किती मजा येईल ना?

असो, मूळ मुद्द्यावर येतो. आजपर्यंत भटकंतीच्या निमित्ताने जिथे जिथे गेलो, प्रत्येक वेळी हा निसर्ग वेगळाच भासला. आडवाटांनी हिंडताना जे काही गूढ,इतिहास असलेल्या पण अनाकलनीय गोष्टी मला दिसल्या त्या शब्दबद्ध करण्याचा माझा मानस आहे. काही गोष्टींना इतिहास आहे तर काहींना ऐकीव पार्श्वभूमी. काहींना विज्ञान आहे तर काही आजही अनुत्तरित.

 या लेखन मालिकेत माझ्या डोक्याला गती मंद करणाऱ्या काही जागा, ठिकाणे यांची मिळवलेली माहिती देतो आहे. अर्थात, थोडे तिखट मीठ लावून.

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, फोटो बरोबर दिलेली माहिती हि त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांकडून मिळवलेली ऐकीव माहिती आहे. त्यामुळे त्याला पौराणिक/धार्मिक/ऐतिहासिक जोड आहे.
पौराणिक/धार्मिक/ऐतिहासिक ऐकीव माहिती आणि अंधश्रद्धा या मध्ये पुसटशी बारीक रेषा आहे. मला जेवढे उमगले ते मांडतो आहे.

लवकरच हे ५ भाग (लिहून) प्रकाशित करत आहे.
अद्भुत आविष्कार (१): कपारीतील चुनकळीची गाय
अद्भुत आविष्कार (२): इंद्रवज्र
अद्भुत आविष्कार (३): सात दरवाज्यांची विहीर.
अद्भुत आविष्कार (४): धोडप किल्ल्याची खाच.
अद्भुत आविष्कार (५): अर्नाळा किल्ल्यावरील ३६ फुटी बुरूज. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: