शनिवार, १६ जुलै, २०१६

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर

राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 


मागच्याच काही महिन्यात रत्नागिरीची कायम लक्षात राहील अशी सफर करून , (अजून)काळा पडून सुखरूप परत आलो. विशेष म्हणजे या पाचही दिवसात एकदाही समुद्रकिनारी गेलो नाही. कारण गेलो होतो ते फक्त कोअर कोकण अनुभवायला. आंबा, सुपारीच्या हक्काच्या बागेत पडून राहायला.  कौलारू घराच्या मोठ्या परसातील एका झोपळ्यावर निवांत बसून तासन तास पक्षी निरीक्षण करायला. अजून एक "अंतू बर्वा" तेथे अजून आहे त्याला अनुभवायला. कोकणी माणसे, कोकणस्थ टोमणे, वर्षभराचा ऑक्सिजन आणी अनेक आठवणी. कमाल अनुभव !

राजापूर म्हणजे माझ्या भावाच्या मामाचे गाव. आमच्या नशिबी "मामाच्या गावाला जाऊया" म्हणणे नसल्याने होळीसाठी भाऊ पळाला का कि त्याच्या मागे पळणे क्रमप्राप्त होते. कोकण म्हणजे समुद्रकिनारे असे असणारे समीकरण बदलून खरे लाल माती अनुभवायला मिळते. राजापुरी जाण्याचे निमित्त असते ते होळीनंतर पुढचे ३ दिवस धोपेश्वर नामक गावात साजरा होणारा 'काका महाराज पुराणिक समाधी मंदीरा'तील समाधी सोहळा. पण जोडीला झोपल्यावर तासान तास बसून, एकावर एक चहा रिचवत पक्षी निरीक्षण करणे, मृदानी नदीच्या अगम्य जंगलात दिवसभर भटकणे. सुपारीच्या बागेत यथेच्च ताणून देणे, शिमग्याला वाड्यान वाड्या पालथ्या घालणे. अश्या बऱ्याच गोष्टी असल्यावर तर  मग काय कोकण दौरा एक प्रकारचा सोहळाच बनून जातो.

चला तर मग राजपूरी पाहुणचार घेऊया.

लाल डब्यातुन उतरले की लाल मातीने आपल्यावर अधिराज्य गाजवायला सुरवात केलेली असते. ताडा-माडाची वने आपल्याला फॉलो करत येऊन पोहोचलेली असतातच. कंडक्टरने आल्याची वर्दी दिली नाही, तोच परत मार्गाची असंख्य बोचकी खिडकी मार्गे ईच्छस्थळी पोहोचतात. हे गनिम चुकवत उरलेल्या पैशांचा हिशेब संपवायचा आणि अर्जुना नदी काठशी  मी मी म्हणत उभ्या लिंबू-सरबत ठेल्याशी ऑर्डर द्यायची.
सरबताबरोबर आजूबाजूची आल्हाददायक हवा मनात भरून घ्यायची आणि कूच करायचे धोपेश्वर गावकडे.

थोड़े चालुन घाटीवर आलो की राजापुर नगरी आपले स्वागत करतें. येथून धूत पापेश्वर मंदिराकडे न जाता उजवा हात पकडायचा कारण धूत पापेश्वर मंदिरात आपण मागच्याच भागात जाऊन आलो की. नसेल गेलात तर तिथे पाहिले जाऊन या. या इथून. राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर
 


कमानीतुन पुढ़े जाताना आजूबाजूला दरवळणाऱ्या हापुसची कलमे आपल्याला लक्ष देण्यास भाग पाडतात. डोक्यावर कधी रातांबी तर कधी सागाच्या झाडावरून कोकीळ साद घालेल तर कधी हॉर्नबिल कर्ण-कर्कश्य आरोळी ठोकुन अपली उपस्थिती मार्क करेल. याच झाडांच्या आजूबाजूला रातकिड़े संध्याकाळ पासूनच आपले अड्डे जमावतील.
असो. त्यांना "नंतर भेटू" म्हणून अमिष दाखवायचे आणि सरळ आपली वाड़ी गाठायची. 'काका महाराज पुराणिक समाधी मंदीरा'तील.

घरात पोहोचतच एक रम्य सकाळ आपल्याला सुखवुन जाते. सकाळची आटोपत आलेली देवपूजेच्या घंटीचा आवाज आणि तुळशी वृंदावनातील सुवासित उदबत्ती आपल्या मना-मनात सुगंध भरते.

चहा-पाणी-गुळवणी झाली की अंगणात झुलत बसायचे. तोपर्यंत उन्हे वर यायला लागतात आणी अशी ताजी-ताजी टवटवीत सकाळ आता सुर्य-किरणांनी सुवर्णमयी होत जाते.

आता मध्यान्ह होत आली तसे अंगातले शर्ट खुंटीवर जायला लागले आणी स्वयंपाक घरात लगबग दिसू लागली. पुणे-मुंबई वरून तसेच इतर ठिकाणाहून येणारे रघुनाथ महाराजांचे भक्त येथे एकत्र जमून कामे वाटून घेऊन आल्या आल्या कामाला पण लागली.

झाडावरचे फणस खाली उतरवून घेण्यात आले तसे आजचा फणसाच्या भाजीचा बेत कळाला. कोणीतरी गोणी भरून नारळ घेऊन आले तसे सोलकढीची तयारी चालू झाली. केळीच्या पानाचा ढीग येऊन अंगणात स्थिरावला. मंदिराची सजावट सुरू झाली. केळीच्या खुंटांची तोरणे लागली आणी उत्सवाचे सूतोवाच जाहले. 

उत्सव तर उद्यापासून सुरू आहे मग आज पुरणपोळी का? कारण आज शिमगा आहे. शिमग्याचो सण.
जशी उन्हे कलू लागली तशी वाडीत हालचाल जाणवायला लागली. गावातील अनेक मुले व गावकरी एकत्र जमले होते. एक लांब-लचक  सुपारीचे खोड मुळासकट उपटून शिमगा खेळायला आणले गेले.


                                                        शिमगा खेळायला या पाव्हणं





थोडा वेळ खेळ पाहिल्यावर होळी साठी काही थांबलो नाही.आता जरा गावात फेरफटका मारून येऊ. गावातील ओळखीच्या लोकांना वर्दी देऊन येऊ म्हंटलं.



 या घाटावरून उतरून 'आशाताई' चा घरात आवाज द्यायचा. येथेही स्वागत, गूळ-पाणी झाल्यावर गावाचा अपडेट घ्यायचा. त्या नवीन नवीन गोष्टी घ्यायच्या हौशी आहेत या ज्ञानावर त्यांना "या वर्षी काय नवीन" असा प्रश्न करायचा आणी पुढचे २-३ तासांची निश्चिती होते. यावर्षी कॅनॉनचा DSLR आलाय त्यांच्याकडे तोही घरबसल्या स्नॅपडीलने. कमाल आहे.
मला एकदम चित्र डोळ्यासमोर आले. पोस्टमन तोंडाचा व्यायाम करत, नावे पुकारत, अळी गाजवत चाललाय आणी "पोस्त" म्हणून DSLR देतोय. वाह !वाह!




एव्हाना वानरांना नवीन कोणी आल्याची बातमी लागलेली असते. टोळी आपल्या समांतर मार्गक्रमण करीत असते. त्यांना दरडवायला छर्रेच्या बंदुका घराघरात तैनात असल्या तरी आपल्याला त्याची काही गरज नाहीये. आपले लक्ष कैरी/ काजू वर ठेवावे आणी एक डोळा तोडताना आपल्याला कोणी बघत नाही ना? यावर.

 
हे सगळे करताना कान आणी मान दोन्ही अलर्ट हवेत. कान, झाडावरून हॉर्नबिल चा कर्कश्य आवाज ऐकायला आणी मान त्याला झाडावर स्पॉट करायला. आम्ही तेच केले आणी या महाशयांचे दर्शन झाले.


"ग्रेट पाईड हॉर्नबिल  किंवा "राज धनेश". प्रेमात पडावा असा पक्षी होता खरच.केरळचे राष्ट्रीय पक्षी असलेले हे महाशय इथे रात्नांगीत काय करत होते देव जाणे पण नाकावर डबल वजन घेऊन ग्रुपने कल्ला करणारा राजधनेश बघण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच.

चला आजचा दिवस संपला उदयापासून उत्सव सुरू होतोय. तेच पुढच्या भागात चला ....
काका महाराज पुराणिक समाधी मंदीर आणी मृदानी नदीच्या जंगलात. 

 वाचत रहा......... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: