शनिवार, ४ जून, २०१६

राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर

राजापूर डायरीज १ : धूत-पापेश्वर मंदीर 

धोपेश्वरी जाण्याचा योग आला आणि बोलावणे आल्यासारखे आमचे पाय धूत-पापेश्वर मंदिराकडे आपसूकच वळले. पहिली भेटीतच हा परिसर खूपच छान वाटला. धूत पापेश्वराचे मंदिर, आजूबाजूने सुपारी-पोफळी च्या झाडांची अभेद्य तटबंदी, मृदानी नदीच्या काठावर वसलेले राजापूरवासीयांचे ग्रामदैव, कोटीतीर्थ धबधबा व त्यातील शिवलिंगे, मुख्यतः कोकणात अगदी माहेरपण जगणारे होर्नबील, खंड्या व इतर पक्षी आणि धूत-पापेश्वर शिव अवताराचा इतिहास सगळेच काही एकदा जरूर पाहावे ऐकावे असे.

राजापूर म्हणजे रत्नागिरी मधले तालुक्याचे गाव. कोकमाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द. कोअर रत्नागिरी.
आमचे पहिल्यांदा प्रवेश झाला तो डायरेक्ट गाभार्यात. ओळखीचा फायदा घेऊनच. पण गाभार्यात जाऊन शिवलिंग बारकाईने बघितले आणी ऐकलेल्या धूत-पापेश्वराच्या इतिहास डोळ्यासमोर आला.

असो. मंदिर आणि त्याचे लोकेशन अगदी मस्त आहे. सुमारे ५० मीटर सभामंडप असून मंदिराचे खांब आणि छत दोन्ही मस्त रंगकाम करून सजवलेल्या आहेत. सभामंडपातून पुढे जाताच गर्भ गृहाच्या चौथर्यावर ५ विरगळ ठेवलेले आहेत. रामायणातील काही प्रसंग त्यावर कोरलेले आढळतात. 

विरगळी च्या जवळच दग्तात कोरलेले लंबोदर आहे आणि इतर देवांच्या शिळेतून घडवलेल्या मूर्ती दिसतात. त्यामध्ये सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट म्हणजे राशी-शिळाचक्र. 
 एकाच अभेद्य दगडात कोरलेल्या या सप्तराशी ओळखणे मात्र अवघड आहे. कोणी माहितगार माणूस असेल तर तो नक्की सांगू शकतो. रोजची पूजा आणी बाकी इतर गोष्टींमुळे याची झीज होत आहे आणी म्हणून त्यातल्या राशी ओळखणे दुरापास्त झालय.

मुख्य मंदिरातून शिवलिंगाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाजूने,मृदानी नदीच्या प्रवाहावर बांधलेल्या छोट्याश्या पुलावरून मागील दत्त मंदिराकडे जाता येते.  दत्त मंदिरापासून मात्र आजूबाजूचा परिसर सुखावह वाटतो. 

मंदिराच्या परिसरात काजू आंबा सुपारीच्या झाडांची रेलचेल असल्याने अनेक पक्षी आणि वानरे यांची मात्र येथे चैन आहे. फोटोमध्ये दिसल्याप्रमाणे खाली नदीपात्रात उतरणाऱ्या पायर्या कोटी तीर्थ कडे जातात. पावसाळ्यात नदीला पाणी असताना हा मार्ग बंद होत असला तरी येथे प्रकटणारा धबधबा प्रवाहातील कोटी-तीर्थ ( छोट्याश्या  गुहेत असलेली अनेक शिवलिंगे ) याला अभिषेक करतो.

दत्त मंदिरातून दर्शन घेऊन वरच्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र बघून खाली यावे आणी येथील माहितगार माणसाला पकडून इतिहास जाणून घ्यावा. अस्सल राजापुरी माणूस जर तुम्हाला भेटला तर मंदिराच्या  इतिहासापासून ते मंदिराच्या ट्रस्टच्या व्यवहाराबद्दलचे स्वताच्या अनुभवाचे गाठोडे तुम्हाला देऊ करेल.

याखेरीज, राजापूरची गंगा हा सृष्टीचा चमत्कार आहे. गंगा नदी काही काळासाठी येथील डोंगरावरील मंदिरात अवतरते. अचानक प्रकट होणे व अचानक गुप्त होणे हे वैशिष्ट्य.काही कुंडामधे गरम पाणी असते. या पाण्याने त्वचारोग बरे होतात असे म्हणतात.  
 

मंदिरात फोटू काढायला परवानगी नाही. ( मी काढलेत पण येथे देत नाही. तसेच इतिहास पण येथे लिहित नाही. कधी गेलात तर शिवलिंगाचा काही भाग टवका उडाल्यासारखा तुटलेला का आहे ते विचारून बघा. )  

मंदिराच्या उजवीकडील बाजूस या फुलाचे झाड आहे. शिवचाफा याचे नाव. U आकाराच्या या फुलामध्ये पराग-कणांच्या  मधोमध छोटेसे शिवलिंग असते म्हणजे तसा आकार असतो. दिसायला सुरेख अश्या फुलाचा वास घ्यायची हिम्मत मात्र करू नका. जास्त वेळ वास घेतल्यास श्वसनाचे विकार होऊ शकतात असे ऐकीवात  आले. काही लोकांनी आमची हे फुल काढायची खटपट चाललेली बघून "ते विषारी झाड आहे" असे सांगितले. वानरे व माकडांनी या परिसरात कितीही उच्छाद मांडला तरी या झाडावर मात्र ते येत नाहीत.
असो. सुरवातीला देवाचे दर्शन घ्या आणी चला पुढे राजापुरात आणी धोपेश्वरात. 

भेटू पुढच्या भागात.
राजापूर डायरीज (२): राजापूर, धोपेश्वर 

वाचत राहा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: